Havaman Andaj । ऑक्टोबर महिन्यामध्ये उन्हाचा चटका वाढल्यानंतर राज्यात आता पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे तापमानात चढ-उतार होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान आज कोकणामध्ये पाऊस होण्याची शक्यता हावामान विभागाने वर्तवली आहे. तर उर्वरित राज्यांमध्ये ढगाळ व कोरड्या हवामानासह कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उर्वरित राज्यांमध्ये कोरड्या हवामानसह, तापमानात चढ- उतार होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, ईशान्य मान्सूनच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी नैऋत्य मान्सूनने निरोप घेतला होता. दुसरीकडे, दक्षिण-पश्चिम मान्सूनने प्रस्थान केले आहे आणि येथे, ईशान्य मान्सून काही दिवसांच्या विलंबाने दाखल होत आहे. या मान्सूनच्या आगमनामुळे संपूर्ण देशात कोणतेही मोठे बदल दिसणार नसले तरी दक्षिणेकडील राज्यांना मात्र याचा फटका नक्कीच बसणार आहे.
तमिळनाडू आणि केरळ या दोन्ही राज्यांमध्ये आजपासून म्हणजेच २१ ऑक्टोबरपासून मान्सूनची सक्रियता सुरू झाली आहे. या राज्यांमध्ये पावसाची नोंद होत आहे. मात्र, त्याचा परिणाम उत्तर भारतातील राज्यांमध्ये सध्या दिसणार नाही. उत्तर भारतातील राज्यांमध्ये हवामान कोरडे राहील.