Chili Market । राज्यात सगळीकडे सध्या पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरिपाची पिके अनेक ठिकाणी वाया गेली आहेत. दरम्यान भाजीपाल्याला देखील म्हणावा असा बाजार भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. सध्या मिरचीचे दर देखील दर खूप कमी झाले आहेत. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. (Chili Market)
नंदुरबार जिल्ह्याला राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून ओळखले जाते. यावर्षी या जिल्ह्यांमध्ये सहा हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर मिरचीची लागवड करण्यात आली आहे. मागच्या वर्षी मिरचीला चांगला बाजारभाव मिळाला होता. त्यामुळे यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली आहे. मात्र सध्या मिरचीचा हंगाम सुरू झाला असून मिरचीचे दर खूपच कमी झाले आहेत. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभा राहिले आहे.
तोडणीचा खर्च निघणेही मुश्किल
मिरचीचा हंगाम सुरू झाला असून मिरचीचे दर जवळपास २० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून उत्पादन खर्च देखील निघत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. व्यापारी त्यांच्या मनमानी पद्धतीने मिरचीचे दर कमी करत असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी यावेळी केला आहे. पंधरा दिवसापूर्वी मिरचीला 35 ते 40 रुपयांपर्यंतचा दर मिळत होता मात्र अचानक दर कमी झाल्याने तोडणीचा खर्च देखील निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
Property Law । महिलांना संपत्तीत असतात ‘हे’ महत्त्वाचे अधिकार, माहिती नसतील जाणून घ्या
मागच्या काही दिवसापासून टोमॅटो आणि कांद्याचे दर देखील कमी झाले आहेत. त्यामुळे आता शेतकरी चांगलेच हतबल झाले असून सरकारने मिरचीचा हमीभाव जाहीर करावा अशी मागणी देखील शेतकरी करत आहेत. राजकीय भाष्य करणारे नेते शेतकऱ्याच्या भावावर का बोलत नाहीत असा संतप्त सवाल देखील शेतकऱ्याकडून उपस्थित केला जात आहे.