Animal Husbandry । सध्या आपल्याकडील अनेक लोक शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय करतात. मात्र पशुपालन व्यवसाय करताना जनावरांना होणाऱ्या आजारामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. सध्या जनावरांमध्ये लाळ्या खुरकुत म्हणजेच एफएमडी आजाराने धुमाकूळ घातला आहे. देशभरात याबाबत लसीकरण देखील चालू आहे. या आजारामुळे पशूंच्या दूध उत्पादनात मोठी घट होते परिणामी दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. आज आपण लाळ्या खुरकूत रोग नेमका कसा होतो? याबद्दल माहिती पाहणार आहोत.
नेमका कसा होतो लाळ्या खुरकूत रोग?
पशुतज्ज्ञांच्या माहितीनुसार, दूषित पाणी आणि दूषित चारा खाल्ल्यामुळे पशूंना लाळ्या खुरकूत आजार होतो. या आजाराचा प्रसार हा पावसाळा या ऋतूमध्ये जास्त प्रमाणात होतो. पावसाळ्यात जनावरे बाहेर चरण्यासाठी जातात यावेळी नदी नाल्यामध्ये साचलेले दूषित पाणी देखील जनावरे पितात यामुळे त्यांना लाळ्या खुरकूत आजार होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जर गोठ्यातील एका जनावराला लाळ्या खुरकूत आजार झाला तर त्याच्या संपर्कातील दुसऱ्या जनावरांना देखील हा आजार होण्याची शक्यता असते.
या रोगावर उपाय काय?
बऱ्याचदा जनावरांना लाळ्या खुरकूत रोग झाल्यानंतर शेतकरी घाबरून जातात. काय करावे? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होतो. मात्र शेतकऱ्यांनी घाबरून न जाता जनावरांच्या उपचारासाठी शेतकऱ्यांना कोणताही खर्च येत नाही. यासाठी शेतकऱ्यांना आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय विभागात संबंधित जनावराचे इअर टॅगिंग करावे लागते. म्हणजेच पशुवैद्यकीय विभागाकडे तुमच्या जनावराची नोंद होते. त्यानंतर तुम्ही संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आपल्या जनावरांना झालेल्या आजाराबद्दल माहिती देऊ शकता. यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी त्यावर निशुल्क लस टोचतात.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी लसीकरण केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांमध्ये संबंधित गाय किंवा म्हैस आपल्या संबंधित आजाराला प्रतिकार करण्याची क्षमता विकसित होत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्त घाबरून जाण्याची गरज नाही. फक्त आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. जनावरांना चांगला पौष्टिक आहार आणि शुद्ध पाणी पिण्यास द्यावे. जेणेकरून या आजाराचा धोका टाळता येईल.