अ) ऊस तोडणीपूर्वीचे तंत्रज्ञान
१) जमीन
ऊस पिकासाठी चांगल्या निचऱ्याची, क्षारांचे प्रमाण कमी असणारी व पीकपोषक घटकांची उपलब्धता योग्य प्रमाणात अलगारी जमीन निवडावी. अशा जमिनीत ऊसाची वाढ चांगली होते व त्यापासून चांगल्या प्रतीचा गूळ तयार करता येतो. खारवट, चोपण, चुनखडीयुक्त जमिनीतील ऊसापासून दर्जेदार गुळ होत नसल्याने अशा जमिनीतील ऊस गूळ आणि काकवी तयार करण्यासाठी वापरू नये.
२) उपयुक्त ऊस वाण
गुळाची प्रत आणि रंग हे गुणधर्म मुख्यत्वेकरून ऊसाच्या जातीवर अवलंबून असतात. प्रत्येक ऊस जातीमधील रसाच्या रासायनिक गुणधर्मात फरक आढळून येतो व या रासायनिक गुणधर्माचा गूळाच्या प्रतीवर परिणाम होतो. म्हणून गुळासाठी शिफारस केलेल्या ऊस जातींची निवड करावी..
i) लवकर पक्व होणाऱ्या जाती कोसी ६७१ (वसंत) को ८०१४ (महालक्ष्मी) को ७२१९ (संजीवनी) को ९२००५
ii) मध्यम उशिरा ते उशिरा पक्व होणारे वाण को एम ७९२५ (संपदा) को ८६०३२ (निरा) को ७५२७, को ९४०१२ (फुले सावित्री), को.एम. ०९०५७ ३) खतांचा संतुलित वापर
उत्तम प्रतीचा गूळ तयार करण्यासाठी मातीचे पृथ:करण करून सेंद्रिय व रासायनिक खतांचा ऊसाच्या वाढीच्या अवस्थेनुसार संतुलीत वापर करणे गरजेचे आहे. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारून अन्नांशाची उपलब्धता वाढते आणि ऊसाची वाढ चांगली होते. त्यामुळे रसाची प्रत सुधारून चांगला गूळ तयार होतो. याकरिता हेक्टरी २५ टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत घालावे. रासायनिक खताची मात्रा शिफारस केल्याप्रमाणे सुरू ऊस पिकांस हेक्टरी २०० किलो नत्र, ११५ किलो स्फुरद आणि ११५ किलो पालाश द्यावे. पूर्व हंगामी ऊस पिकांस प्रति हेक्टरी २७२ किलो नत्र, १७० किलो स्फुरद, आणि १७० किलो पालाश द्यावे, शिफारसीपेक्षा जास्त नत्रयुक्त खते दिल्यास गुळाची प्रत खराब होऊन उताराही घटतो व गुळाच्या टिकाऊपणावरही अनिष्ट परिणाम होतो. स्फुरदयुक्त रासायनिक खते योग्य प्रमाणात दिल्यास रसाची प्रत सुधारते तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापरामुळेसुद्धा गुळाची प्रत सुधारण्यास मदत होते.
Havaman Andaj । मोठी बातमी! गणेश विसर्जनाच्या दिवशी ‘या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस; अलर्टही जारी
४) पाणी व्यवस्थापन
पाण्याचा अवाजवी वापर किंवा ताण यांचा रसाच्या प्रतीवर आणि पर्यायाने गुळाच्या प्रतीवरही अनिष्ट परिणाम होतो. निरनिराळ्या हंगामात जमिनीचा मगदूर पाहून ऊस पिकास पाणी देणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी गरजेप्रमाणे पाणी द्यावे. ऊस तोडण्यापूर्वी कमीत कमी १५ दिवस अगोदर उसाला पाणी देऊ नये.
५) ऊस पक्वता व तोडणी ऊस वाढीसाठी साधारणपणे २१ ते ३० अंश सेल्सियस व पक्वतेसाठी १६ ते १८ अंश सेल्सियस तापमान पोषक असते. ऑक्टोबरच्या मध्यानंतर ऊस पक्व होण्यास सुरुवात होते. ऊसाची पक्वता ब्रिक्स हैड्रॉमीटर अथवा हॅड रिफ्रक्टोमीटरने पहावी. ऊस रसाचे ब्रिक्स २१ डिग्री पेक्षा जास्त आल्यास असा ऊस गूळ तयार करण्यास योग्य आहे असे समजावे. पक्व झालेल्या उसापासून गुळाचा उतारा अधिक मिळून टिकाऊपणाही वाढतो. धारदार कोयत्याने पक्व उसाची जमिनीलगत तोडणी करावी. शेंड्याकडील २-३ अपक्व कांडया बाइधासहीत तोडून टाकाव्यात व पाला काढून ऊस स्वच्छ करावा.
६) ऊसाची गाळपपूर्व स्वच्छता ऊसाची गाळपपूर्व स्वच्छता करणे आवश्यक आहे. ऊसावरील मातीचे कण, बुरशीचे अवशेष तसेच मेण चिकटून राहिलेले पाचट इ. यांचा रसाच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होतो. त्याकरिता ऊस ६० सेल्सियस तापमानाच्या गरम पाण्यात १० मिनिटे बुडविल्यास उसाची गाळपपूर्व स्वच्छता होते आणि परिणामी गुळाची प्रत सुधारते.
Buffalo Milk । करा ‘या’ जातीच्या म्हशीचे संगोपन! दिवसाला मिळेल ‘इतके’ लिटर दूध, होईल हजारोंची कमाई
ब) ऊस तोडणीनंतरचे तंत्रज्ञान
ऊसाचे गाळप
ऊस तोडणीनंतर लवकरात लवकर म्हणजे ६ ते १२ तासांच्या आतच ऊसाचे गाळप करणे गरजेचे आहे. ऊस जास्त शिळा झाला तर चांगला गूळ तयार होत नाही. ऊस गाळपासाठी आडव्या तीन लाट्यांचा उत्तम गाळप क्षमता असलेल्या चरकाची निवड करावी. म्हणजे रसाचा उतारा जास्त मिळतो. ऊसाच्या रसात फिनॉलिक द्रव्ये असतात. या द्रव्यांचा लोखंडाशी संबंध आल्यास रासायनिक क्रिया होवून गर्द निळ्या किंवा काळ्या रंगाची संयुगे तयार होतात, त्याचा गुळाच्या रंगावर विपरीत परिणाम होतो. म्हणून रसाचा लोखंडाशी संपर्क कमी करण्यासाठी स्टेनलेस स्टील चरकाचा वापर करावा. २) रस गाळण यंत्रणा
ऊस रसातील बगॅसचे लहान कण, पाचटाचे तुकडे, मातीचे कण इत्यादी कचरा काढून रस स्वच्छ करणे आवश्यक असते. स्थाकरिता यांत्रिकी पद्धतीने फिरणाऱ्या आणि दोन गाळण्यांच्या (२ मि.मी. आणि ०.५ मि.मी.) अंतर्भाव असलेल्या रस गाळण यंत्रणेचा वापर करून रस चांगला गाळून मंदानात घ्यावा. स्वच्छ रस पंपाच्या सहाय्याने फूडग्रेड प्लॅस्टीकच्या साठवण हौदांत घ्यावा. या हौदातून रस नायलॉनच्या गाळणीतून गाळून तो काहीलीत घ्यावा. ३) रस उकळणे आणि मळी काढणे.
Agriculture News । सावधान! यामुळे उत्पन्नात होतेय मोठी घट, जाणून घ्या सविस्तर
रस उकळण्यासाठी पत्र्याची काहील आतील बाजुने उडदाच्या पीठाने लाडण करून घ्यावी. रस उकळण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचे चिमणी चुलाण वापरावे. चुलाण पेटवून रस तापत ठेवावा. मळी व्यवस्थित काढण्यासाठी १५० ते २०० ग्रॅम चुना ५ लिटर पाण्यात मिसळून त्याचे द्रावण रसात मिसळावे. तप्त रसातील मळी संपूर्णतः निघण्यासाठी प्रति १००० लिटर रसासाठी २ किलो भेंडी वनस्पतीच्या खोड व फांद्याचा ठेचा करून १५ लिटर पाण्यात कुस्करून त्याचा अर्क गाळून घ्यावा व तो अर्क २ ते ३ समान हप्त्यात विभागून काहीलीत टाकावा अथवा भेंडी वनस्पतीपासून बनविलेली पावडर १.६ किलो प्रति १००० लिटर रस या प्रमाणात लगदा करून काहिलीत रसामध्ये टाकावी. चुन्याची निवळी घातल्यामुळे रसातील नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ अविद्राव्य होऊन जाड काळ्या मळीच्या रूपाने (ढोरमळी) रसावर तरंगू लागतात. शिव्याच्या सहाय्याने मळी काळजीपूर्वक काढावी. चुन्याचे प्रमाण जास्त झाले तर गूळ गडद तांबूस रंगाचा होण्याचा धोका असतो. ढोरमळी काढण्याचे काम पहिल्या ३० ते ३५ मिनिटात होणे गरजेचे आहे. ढोरमळी काढल्यानंतर आर्सेनिक मुक्त फॉस्फरीक (स्फुरद) आम्ल १५० ते २०० मि.ली. प्रति १००० लिटर ऊस रसासाठी वापरावे. रसातील अधिक नत्राचा तसेच रसात घातलेल्या चुन्याच्या निवळीचा गुळाच्या रंगावर विपरीत परिणाम टाळण्यासाठी फॉस्फरीक आम्लाचा उपयोग होतो. तसेच रस उकळताना साखरेचे ग्लुकोजमध्ये होणारे रूपांतर कमी करण्यासाठीही या आम्लाचा उपयोग होतो. मात्र फॉस्फरीक आम्लाचे प्रमाण जास्त झाल्यास मूळ मऊ बनतो. कणी बारीक धरते व गूळ चिक्कीसारखा होतो.
४) अनावश्यक रसायनांचा वापर टाळा गुळाच्या सध्याच्या विक्री व्यवस्थेत गुळाची प्रथमदर्शनी पसंती तसेच गुळाला बाजारात मिळणारा दर हा गुळाच्या रंगावर बन्याच अंशी अवलंबून आहे. त्यामुळे बरेचसे शेतकरी गुळाला गडद पिवळा रंग येण्यासाठी हैड्रॉस, बाफा पावडर, भेंडी पावडर इ. रासायनिक पदार्थाचा अतिरिक्त वापर करतात. हे रासायनिक पदार्थ मानवाच्या आरोग्यास हानीकारक आहेत. या रासायनिक पदार्थाच्या वापरामुळे गुळातील गंधकाचे प्रमाण वाढते. अन्न भेसळ कायद्यानुसार गुळामध्ये सल्फरडाय ऑक्साईडचे प्रमाण ५० भाग प्रति दशलक्ष (पीपीएम) पेक्षा जास्त असू नये, हैड्रॉसच्या अतिवापराने सोडीयमचे प्रमाण वाढते. त्यामुळे हवेतील बाप्प गुळात शोषले जाऊन हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढताच गुळास पाणी सुटते व त्यात बुरशीची वाढ होते. असा गुळ खाण्याच्या दृष्टिने हानीकारक ठरतो. यासाठी रासायनिक पदार्थाचा वापर टाळणेच हितकारक आहे.
५) दर्जेदार काकवी तयार करण्याची प्रक्रिया
काहीलीतील पाकाचे तापमान १०३.५ अंश सेल्सीयस आल्यानंतर काकवी तयार होते. पाकाची ही स्थिती ओळखण्यासाठी इलेक्ट्रॉनिक थर्मामिटरचा वापर करणे फायद्याचे ठरते. या काकवीच्या अवस्थेला काहील त्वरीत खाली उतरावी आणि काकवीसाठी खास तयार केलेल्या स्टीलच्या पिंपात ओतावी. अशा पिंपाना तळापासून थोड्या उंचीवर तोटी बसविलेली असावी. काकवी गरम असताना त्यात काकवीच्या वजनाच्या प्रमाणात सायट्रीक आम्ल ४०० मिली ग्रॅम प्रति किलो टाकावे म्हणजे काकवी आकर्षक रंगाची होवून तिच्यात साखरेचे खड़े धरत नाहीत. काकवी खराब होऊ नये तसेच टिकाऊपणा वाढावा म्हणून त्यात पोटॅशियम मेटाबायसल्फाईट १ ग्रॅम प्रति किलो किंवा बेन्झाईक आम्ल ५ ग्रॅम प्रति किलो टाकावे. काकवी ८ ते १० दिवस पिंपात तशीच संथ राहू द्यावी. म्हणजे तिच्यातील जड कण, अविद्राव्य घटक पिंपाच्या तळाला बसतील. काकवीच्या पृष्ठभागावर तरंगणारे पदार्थ हलकेच शिव्याने काढून टाकावेत. त्यानंतर पिंपाच्या तळाशी थोडचा उंचीवर बसवलेल्या तोटीतून हळुवारपणे काकवी दुसऱ्या अॅल्युमिनियम अथवा स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात गाळून घ्यावी. त्यानंतर काकवीस हलकी उकळी (५० ते ६० से.) आणावी. नंतर हे भांडे शेगडीवरून खाली उतरावे. ग्राहकांच्या पसंतीनुसार काकवीचे ब्रिक्स ७२ ते ७४* पर्यंत ठेवावे. उकळत्या पाण्यात साधारणपणे १५ ते २० मिनिटे बुडवून बाटल्या निर्जंतूक कराव्यात. आकर्षक अशा २०० २५० आणि ५०० मिली क्षमतेच्या बाटल्या तोंडाकडे १ सें.मी. जागा मोकळी सोडून त्यामध्ये गरम काकवी भरावी. बाटल्या मशीनच्या सहाय्याने हवाबंद करून स्वच्छ पुसून त्यावर आकर्षक लेबल लावून किरकोळ व घाऊक विक्रीसाठी पाठवाव्यात..
६) दर्जेदार गूळ तयार करण्याची प्रक्रिया
काकवीच्या स्थितीनंतर रस ऊतू जाण्याची क्रिया पूर्ण होऊन पाक व्यवस्थित उकळू लागतो. त्यावेळी २०० मिली शेंगदाणा तेल काहीलीत घालावे म्हणजे पाकाचे तापमान वाढण्यास मदत होते व पाक करपण्याचा धोका टाळला जातो. पाकाचे तापमान मोजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक थर्मामीटरचा वापर करावा. पाकाचे तापमान ११८ + ०.५ सेल्सियस आले असता काहील चुलाणावरून उतरवावी व वाफ्यात गूळ पाक ओतावा. इलेक्ट्रॉनिक थर्मामीटर उपलब्ध नसल्यास गूळ तयार झाला आहे हे पाहण्यासाठी पाकाची गोळी चाचणी घ्यावी. यासाठी पाक लाकडी फावड्यावर घेवून तो पाक थंड पाण्यात बुडवून हाताने त्याची गोळी तयार करावी ही गोळी काहीलीच्या मोकळ्या पत्र्यावर आतील बाजूवर जोराने फेकावी. गोळांचा पत्र्यावर टणक व खड खड असा आवाज आल्यास गूळ तयार झाला आहे असे समजावे. पाक थंड होत असताना घोटण्याची क्रिया सावकाश करावी. घोटणी जास्त झाल्यास गूळ मऊ बनतो व गुळास स्वाळपणा येत नाही. गुळाचे तापमान ७६ सेल्सियस इतके खाली आल्यानंतर गूळ साच्यात भरून बाजारपेठेतील मागणीनुसार १,२,५,१० किंवा ३० किलो वजनाच्या ढेपा तसेच लहान मोठ्या आकाराच्या बड़चा, मोदक इत्यादि तयार करावेत.
७) गूळ पावडर प्रक्रिया गुळापासून तयार केलेला पावडरचा (भुकटी) रंग विशिष्ट गुणधर्मामुळे गुळापेक्षा अधिक उठावदार असतो. गुळपावडर मध्ये ओलाव्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने साठवण क्षमता चांगली असते. गूळ पावडर तयार करावयाची असल्यास गूळ साच्यात न भरता चाफ्यातच थंड होऊ द्यावा. गूळ वाफ्यात घट्ट होण्यापूर्वीच दाताळ्याने उभ्या व आडव्या रेघा मारून गूळ हालवून घेऊन लहान लहान तुकडे करावेत. हे तुकडे वाफ्यात घट्ट झाल्यानंतर सूर्यप्रकाशात कापडाच्या आवरणाखाली ठेवून वाळवावेत. वाळलेला गूळ लाकडी बडवण्याने बारीक करावा. बारीक केलेला गूळ वेगवेगळ्या चाळण्यातुन चालुन घेऊन दोन तीन दिवस चाळवून त्यातील आर्द्रतेचे प्रमाण कमी करावे. पावडरीच्या वर्गवारीनुसार पॉलीथीनच्या आकर्षक पिशव्यातून पॅकिंग करून बाजारात विक्रीसाठी पाठवावे. पॉलीपक केलेली गूळ पावडर प्रतिवर कोणताही परिणाम न होता दोन तीन वर्ष – चांगल्या स्थितीत राहते.