संतुलित आहारासाठी (Balanced Diet) भाजीपाला खाणे आवश्यक असते. बऱ्याचदा डॉक्टर सुद्धा आपल्याला भाजीपाला खाण्याचा आग्रह करतात. पालेभाज्यांमध्ये मेथीला विशेष महत्त्व आहे. प्रचंड आवडीने ही भाजी खाल्ली जाते. त्यामुळे बाजारात या भाजीला कायम मागणी असते. यामुळे मेथीच्या पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. मात्र त्यासाठी योग्य व्यवस्थापन करावे लागते.
थंड हवामानासाठी पोषक पीक
खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात मेथीसाठी पोषक वातावरण असल्याने याठिकाणी मेथीची शेती करता येते. मेथी हे कमी दिवसांत येणारे पीक असल्याने यातून उत्पन्न देखील लगेच मिळते. मेथीसाठी थंड हवामान (Cold Environment) जास्त पोषक असते. त्यामुळे सध्याच्या रब्बी हंगामात मेथीची शेती करून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. याकाळात मेथीची लागवड करण्यासाठी तुम्ही कसुरी मेथीची (Kasuri Methi) निवड करू शकता.
Ahmednagar News । अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा दिड एकर ऊस आगीत खाक! शेतकऱ्याला अश्रू अनावर
मेथीची लागवड कशी करावी ?
मेथीची लागवड करण्यासाठी मध्यम आणि पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल, अशा जमिनीची निवड करावी. सपाट वाफ्यांमध्ये 20 ते 25 सेंमी. अंतरावर ओळीने मेथीचे बी पेरावे. बी ओळीने पेरले असल्यास त्याची खुरपणी आणि काढणी करणे सोपे जाते. मेथी पेरल्यानंतर शेतीला लगेच हलके पाणी द्यावे. पेरणीनंतर कमीत कमी 3 ते 4 दिवसांत किंवा जास्तीत जास्त 6 ते 7 दिवसांत मेथी उगवते. 30-35 दिवसांनी मेथीची भाजी काढण्यायोग्य होते.
मेथीच्या पिकासाठी खते आणि पाणी व्यवस्थापन कसे करावे ?
मेथी पेरल्यानंतर 15 दिवसांनी खुरपणी करून हेक्टरी 20 किलो नत्र दिल्याने पिकांची चांगल्या पद्धतीने वाढ होते. तसेच पेरणीनंतर 3 आठवड्यांनी 10 लिटर पाण्यात 150 ग्रॅम युरिया मिसळून फवारणी केल्यास मेथीचे पिक चांगले येते. मेथीवर कीड आल्यास किडीच्या नियंत्रणासाठी 15 मि.ली. मॅलॅथिऑन (50% प्रवाही) 10 लिटर पाण्यात मिसळावे आणि दर 8-10 दिवसांच्या अंतराने पिकावर फवारावे.