Agricultural News । सध्याच्या ऋतुचक्रावर कोणाचाही विश्वास नाहीये. पाऊस कधीही बरसत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नवीन वर्षाची सुरुवात होताच सलग तीन दिवस ढगाळ वातावरणामुळे धुके पडले. त्याचबरोबर काही ठिकाणी पाऊसही झाला. या धुक्यांचा आणि पावसाचा रब्बी हंगामातील पिकांसोबत द्राक्ष व डाळिंब बागेला मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधे व फवारणीचा खर्च देखील वाढला आहे.
सध्या वातावरणात मोठे बदल होत चालले त्यामुळे शेतकऱ्यांना फळबागेत दहा दिवसात दोनदा फवारणी करण्याची वेळ आली आहे. धुक्यामुळे शेतकऱ्यांच्या बागेवर मोठे परिणाम होत आहेत. फवारणीसाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च देखील होत आहे. अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि ढगाळ वातावरणाचा फटका द्राक्ष उत्पादकांना (Grape growers) बसला आहे. मागील काही दिवसांपासून द्राक्षाचे दर अचानक कमी झाले आहेत. शिवाय सांगली भागातील द्राक्ष (Grapes) बागांवर बुरशीजन्य करपा रोग पडला आहे, त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या भागात करप्याचा प्रादुर्भाव झालेल्या द्राक्षांच्या घडाला (Grape price) रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे.
द्राक्षाच्या दरात घसरण अन् फवारणीचा खर्च वाढला
द्राक्षाची निर्यातीसाठी होणारी पॅकिंग देखील बंद पडली आहे. १२० ते १४० रूपयांचे असणारे दर थेट ५० ते ६० रूपयांवर आले आहेत. अचानक पडलेल्या दरामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पुण्यात येऊन द्राक्षाची थेट ग्राहकांना विक्री करत आहेत. जर हे चित्र असेच राहिले तर शेतकऱ्यांवर आणखी वाईट वेळ येऊ शकते, हे नक्कीच.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील तब्बल ५ हजार एकर क्षेत्रावरील द्राक्षबागांवर बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगामुळे द्राक्षाच्या घडांवर काळे डाग पडले आहेत. त्यामुळे या मालाला लोकल मार्केटमध्ये दर मिळत नाही. त्यामुळे अशी द्राक्ष रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. निर्यातक्षम द्राक्ष बाधित झाल्यामुळे शेतऱ्यांचे जवळपास ३०० कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान देखील झाले आहे.